मुंबई: काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेकडून जोरदार समाचार घेण्यात आला आहे. भाजप एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. कुटुंबकेंद्रित असणं व व्यक्तिकेंद्रित असणं यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, अशी टीका शिवसेनेकडून सामनामधून करण्यात आली आहे.
मोदी-शाह यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जातं का? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती, अशा शब्दांत शिवसेनेकडून भाजपचा समाचार घेण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.