Maharashtra Politics: संजय राऊत लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार! तारीख अन् ठिकाणही ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:24 PM2022-11-22T12:24:31+5:302022-11-22T12:25:51+5:30
Maharashtra News: ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंनंतर आता संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून पुढे गेली आहे. महाराष्ट्रात असताना या यात्रेत महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. संजय राऊतांनी यांनी याबाबत माहिती दिली.
तब्बल ११० दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.
सावरकर आपलेच आहेत
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींच्या टिकास्त्राच्या पार्श्वभूमीवर सावरकर आपलेच आहेत, या भूमिकेचा संजय राऊत यांच्याकडून यावेळी पुनरुच्चार करण्यात आला आहे. महाराष्ट्रानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात जाणार आहे. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. मध्य प्रदेशात किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
राहुल गांधी लोकांना आपले वाटतात
राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात. भारत जोडो यात्रेला त्यामुळे देशभरातूल समर्थन मिळत आहे. राहुल लोकांना आपला वाटतोय, तो यासाठीच भारत जोडो यात्रेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राहुल गांधी यांनी आपली विचारपूस केली. राहुल गांधी यांचा मला फोन येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते.
राहुल गांधींनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती
अलीकडेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले होते. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.
दरम्यान, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.., असे ट्विट संजय राऊत यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"