Vinayak Raut On Union Budget 2023: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी या बजेटमधून घोर निराशा झाली आहे. पंतप्रधान मोदी सातत्याने मुंबईत येत आहेत. मुंबईकरांसाठी मोठे पॅकेज जाहीर केले जाईल, असे वाटले होते. मात्र, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केले. यावर विरोधकांनी टीका केली.
शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करत असताना, त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी योग्य बाजार मिळावा, यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. ती करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, या अर्थसंकल्पात ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर अवाक्षर काढण्यात आलेले नाही. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कोणत्या टप्प्यावर देश आहे, याबाबतही सांगण्यात आलेले नाही. अदानी समूहामुळे झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानीमुळे मोदी सरकार यावर काहीच भाष्य करताना दिसले नाही, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली.
अदानीमुळे भारताची अर्थव्यवस्था गतीने घसरतेय
अदानी समूहामुळे भारताची अर्थव्यवस्था गतीने घसरत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ५ ट्रिलियन डॉलरच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले, असा दावा विनायक राऊत यांनी केला. इन्कम टॅक्समध्ये सवलती देत असताना, यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता होती, असे विनायक राऊत म्हणाले. तसेच सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून सात प्राधान्य असलेल्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या मायनॉरिटी कम्युनिटीला यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले कुठेही दिसले नाही. यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, या शब्दांत विनायक राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"