Rahul Gandhi In Lok Sabha: “क्रांतिकारी काम...”; लोकसभेतील भाषणानंतर संजय राऊतांनी केले राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 08:46 PM2023-02-07T20:46:03+5:302023-02-07T20:46:50+5:30
Rahul Gandhi In Lok Sabha: राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना अदानी समूहावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.
Rahul Gandhi In Lok Sabha: अमेरिकेच्या हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर एकच खळबळ उडाली. अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. अदानी समूहाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. अदानी समूहात गुंतवणूक केलेल्या अनेक कंपन्यांनाही तोटा सहन करावा लागला. यानंतर याचे पडसाद देशाच्या संसदेत उमटल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
देशातील रस्ते, बंदरे, विमानतळे सारेकाही अदानींनाच का बरे दिले गेले? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारला. अदानी ८ ते १० व्यवसायांमध्ये काम करतात. सिमेंट, पोर्ट, एनर्जी आणि इतर बरेच काही. मग लोक विचारायचे की २०१४ ते २०२२ पर्यंत अदानींच्या संपत्तीत इतकी मोठी वाढ कशी काय झाली? ते ८ अब्ज वरून १०८ अब्जांपर्यंत कसे काय पोहोचले? २०१४ मध्ये ते श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. अदानी देशातील प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींचे अदानींसोबतचे नाते नेमके काय? अशी प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधींनी केली.
संजय राऊतांनी केले कौतुक
राहुल गांधी यांच्या भाषणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत कौतुक केले आहे. सत्य बोलणे हे एक क्रांतिकारी काम आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत ते काम केले. एक धमाकेदार भाषण. जय हिंद, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे. याशिवाय संजय राऊतांनी प्रियंका गांधी यांचे ट्वीटही जोडले आहे ज्यामध्ये राहुल गांधीच्या लोकसभेतील भाषणाची लिंक देण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वीही संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेतही संजय राऊत सहभागी झाले होते. यावेळी भरपावसात संजय राऊतांनी सहभाग नोंदवला. या यात्रेदरम्यान संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"