Sanjay Raut: “जनतेची इच्छा असेल तर २०२४ मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हावं लागेल”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 02:27 PM2023-01-21T14:27:35+5:302023-01-21T14:28:25+5:30
Sanjay Raut: राहुल गांधी हे आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आगामी काळात आव्हान उभे करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो पदयात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर आता पंतप्रधानपदाबाबत २०२४ नंतर ठरवू. पण जनतेची इच्छा असेल, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, व्यक्ती आणि नेतृत्वात फरक करणार नाही. राहुल गांधी तेच आहेत. राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा तयार केली आहे. ती चुकीची आहे. तुमच्या मनातील राहुल गांधी यांची जी प्रतिमा आहे. ती लोकांनी तोडली आहे. राहुल गांधी ४५०० किमीपेक्षा अधिक अंतर पायी चालत आहेत. हे हिंमतीचे काम आहे. त्याकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. त्यामुळेच शिवसेना या यात्रेत सामील झाली, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
२०२४ मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे लागेल
पत्रकारांनी राहुल गांधी हे पंतप्रधान होतील का, असा प्रश्न संजय राऊतांना केला. यावर, राहुल गांधी देशाचे नेतृत्व करू शकतात. कोणताही व्यक्ती देशाचे नेतृत्व करू शकते. पंतप्रधानपदाबाबत २०२४ नंतर ठरवू. लोकांना जर वाटत असेल, राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावे तर त्यांना बनावे लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आगामी काळात राहुल गांधी यांचे नेतृत्व चमत्कार करेल. राहुल गांधी हे येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आव्हान उभे करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. तसेच थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही. आज काँग्रेसकडे खासदार कमी आहेत. पण २०२४मध्ये काँग्रेसचे खासदार वाढतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"