मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी तथा शाही ईदगाह मशीद प्रकरण सुनावणी योग्य असल्याचे आज (गुरुवार) आलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर, आता या मुद्द्यावर राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. यातच, शिव सेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमीशी संबंधित प्रकरण स्वीकारले आहे. आता एक कायदेशी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि दोन्ही पक्षांची बाजू एकली जाईल.
पीटीआय सोबत बोलताना राज्यसभा कासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. शंकराचार्यांना बोलावले नाही. स्वतः जाऊन मंदिराचे उद्घाटन केले. तर, प्रभू श्रीरामांनीही त्यांचा लोकसभेत पराभव करून, 'माझ्या नावावर राजकारण होऊ नये', असा संदेश दिला. तो सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमाने झालेला आम्हा लाखो करोडो हिंदूंच्या भावनांचा विजय होता."
चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, "जर यांनी कृष्ण जन्मभूमीच्या बाबतीतही हेच काम केले तर..., मी सांगते, भगवान श्रीकृष्णांनी 17 वेळा मथुरा सोडली असेल, मात्र अठराव्यांदा जेव्हा आले, त्यांनी कंसाचा वध केला होता. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या नावाने जे राजकारण करतील, त्यांना धडा तेच शिकवतील."
कृष्ण जन्मभूमीवर सुनावणी सुरूच राहणार - मथुरेतील भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. याप्रकरणी हिंदू पक्षाने 18 याचिका दाखल केल्या होत्या. यात शाही ईदगाह मशिदीची जागा आपली (हिंदू) असल्याचे म्हणण्यात आले होते. एवढेच नाही तर, आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती.
यानंतर, मुस्लीम पक्षानेही प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट, वक्फ अॅक्ट, लिमिटेशन अॅक्ट आणि स्पेसिफिक पझेशन रिलीफ अॅक्टचा हवाला देत हिंदू पक्षाच्या याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, आता अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 याचिकांवर सुनावणी सुरू राहणार आहे. पुढची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे.