नवी दिल्ली - एखाद्या राज्यात SIT इतक्या प्रमाणात कधीच स्थापन झाल्या नाहीत. केंद्राने नवीन रेशन पॉलिसी जाहीर केलीय तसं SIT चं केलंय. जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही कुठल्याही तपासाला तोंड द्यायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडणार आहात. सत्ताधाऱ्यांची अनेक प्रकरणे समोर आलीत ते समोर आणू त्यावर SIT ची मागणी करू. या सरकारला SIT स्थापन करण्याची खाज आहे आता खाजवत बसा. या सरकारनं SIT आणि पोलिसांचे महत्त्व कमी केले. विधानसभेत कुणी उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. दुसऱ्याची बदनामी करण्याचं काम सुरू आहे. हे अग्निदिव्य आहे त्यातून शिवसेना पुन्हा बाहेर पडेल आणि महाराष्ट्राला प्रकाशमान करेल. एसआयटी स्थापन करून शिवसैनिकांचे मनोबल खच्चीकरण होईल असं कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत असं त्यांनी सांगितले.
अण्णा हजारे आता गप्प का?अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. महाराष्ट्रात भ्रष्टमार्गाने सरकार आलंय त्यावर अण्णांनी जाब विचारला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. केंद्र आणि राज्य सरकार खुलेआम आमदार विकत घेतायेत. सत्ता उलटवायेत. अण्णा हजारे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकायुक्तांच्या मार्गाने खुली चर्चा करायला हवी. गुप्तमार्गाने चौकशी का? असा सवाल राऊतांनी विचारला.
तसेच मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारले असतील. हा भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे या विषयावर गप्प का? असंही राऊत म्हणाले.
भाजपा नेते दुतोंडी सापशेतकऱ्यांच्या हितासाठी मॉलमध्ये किंवा मोठ्या स्टोअरमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली. हा निर्णय पूर्णपणे द्राक्ष उत्पादक आणि शेतकऱ्यांचा हिताचा होता. त्याला विरोध केला. मद्य धोरणाला सरकार पाठिंबा देताय असा आरोप केला. आज तेच हा निर्णय घेऊन पुढे येतायेत. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार कुठे आहेत? त्यांनी स्वत:ची वक्तव्य पाहावी. हे दुतोंडी साप आहेत दोन्ही बाजूने वळवळतात अशा शब्दात संजय राऊतांनीभाजपा नेत्यांवर बोचरी टीका केली.
रामसेतूच्या मुद्द्यावरून भाजपाला फटकारलंरामसेतू भाजपासाठी कधीकाळी प्रचाराचा मुद्दा होता. रामाच्या अस्तित्वासाठी भाजपा, संघाने अनेक आंदोलन केलीत. आम्ही जी आंदोलन केली ती राजकीय फायद्यासाठी होती असं भाजपानं सांगावं. राम सेतूचं अस्तित्व नव्हतं मग रामायणातील कथा दंतकथा होत्या का? यावर भाजपाने भाष्य करावे असं संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं.