कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतबेळगावमध्ये पोहोचले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सामील झाले. यादरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
“महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभीमानासाठी जसं आम्ही लढतोय, तसंच इथे एकीकरण समिती लढतेय. यावेळी मला एकीची वज्रमूठ दिसतेय. भाजप हिंदुत्वाचा प्रचार इथे करतोय. यांना ३०० रुपयांना हिंदुत्व मिळतं. यांचं हिंदुत्व खोक्यात आहे. शिवसेना फोडताना यांना हिंदुत्व दिसलं नाही? हिंदुत्ववादी, हिंदुहृदय सम्राट यांची शिवसेना, ज्या पद्धतीनं पैसे फेकून, सत्तेचा गैरवापर करून फोडली तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होतं? ज्या हिंदुत्वासाठी शिवसेनेनं बिलिदान दिलं, दंगलीत मुंबईसह महाराष्ट्र वाचवला, हिंदूंचं रक्षण केलं तेव्हा भाजपचे लोक घाबरून घराला कड्या लावून बसले होते. ती शिवसेना फोडताना हिंदुत्व आठवलं नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
“आज आपण सर्वजण एकत्र आहोत. सीमाभाग ही कर्नाटक सरकारची जहागीर नाही. लोकशाहीच्या मार्गानं, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळू द्या. जर न्याय विकत मिळत नसेल, सर्वोच्च न्यायालयावर दबाव नसेल तरच न्याय होईल आणि सीमाभागाला न्याय मिळेल,” असंही ते म्हणाले. “२० लाख लोक देशात एकत्रपणे न्याय मागतायत आणि सर्वोच्च न्यायलय ऐकायला तयार नाही. याचा अर्थ त्यांच्यावर दबाव आहे. जेव्हा तारीख येते तेव्हा कर्नाटकाचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना विचारा तुम्ही कितीदा दिल्लीत गेला, वकिलांची बैठक घेतली आणि काय दबाव आणला. थोडे खोके वर पोहोचवा, न्याय मिळेल आम्हासा. आता खोक्यांतच न्याय मिळतो,” असं वक्तव्य त्यांनी केला.
शिंदे येतायत असं ऐकलं
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी प्रचाराला येतायत असं कळलं. त्यांना प्रश्न विचारा, आमच्या विरोधात येथे प्रचाराला येता याची लाज नाही का वाटत? आमची शिवसेना खरी, आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणता आणि तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करता? आम्ही बेळगावच्या आंदोलनात होतो असं शिंदे म्हणतात. मराठी माणसाचं रक्त असेल तर असा कोणताही माणूस सत्तेवर बसल्यावर बेळगावात येऊन एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणार नाही. हे जे येतायत त्यांना प्रश्न विचारा, काळे झेंडे दाखवा,” असं राऊत म्हणाले.