नवी दिल्ली : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत.शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे. शिवसेनेचे लोकसभेत १८ सदस्य तर राज्यसभेत ३ सदस्य आहेत. लोकसभेत एनडीएचे ३८० सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे १८ सदस्य कमी झाल्याने एनडीएची सदस्यसंख्या ३६२ झालेली आहे. शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही.भाजपसोबत काडीमोड घेतल्यामुळे शिवसेना खासदार सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेणार आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याबद्दल ते केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत. बिजू जनता दल (बीजेडी) सुद्धा गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही आघाडीत नाही. त्यामुळे बीजेडीच्या सदस्यांची आसन व्यवस्थाही स्वतंत्र आहे.
ना रालोआत, ना संपुआत; शिवसेनेचा स्वतंत्र बाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:47 AM