पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने खलिस्तान मुर्दाबाद मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान खलिस्तान समर्थक आणि मार्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये जबरदस्त चकमक उडाली. दोन्ही बाजूंना तलवारी दिसत होत्या. यावेळी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. आता यासंदर्भात पंजाब शिवसेनेकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे.
पटियाला येथील घटनेत शिवसैनिकांचाही सहभाग होता, हे एक प्रकारे शिवसेना पंजाबने मान्य केले आहे. शिवसेनेचे पंजाब अध्यक्ष योगराज शर्मा यांनी, याप्रकरणी मोठी कारवाई करत, पटियालाचे शिवसेना नेते हरीश सिंगला यांना पक्षातून काढले आहे. यासंदर्भात शर्मा यांनी नेवेदन जारी करत माहिती दिली आहे.
हरीश सिंगला यांना पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल पक्षातून काढण्यात येत आहे, असे योगराज शर्मा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच बरोबर, हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या आदेशावरून घेण्यात आल्याचेही, त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली पटियालामध्ये आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खलिस्तानविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, काही शीख संघटनाही रस्त्यावर उतरल्या आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला.