मुंबई, दि. 5 - गायक मिका सिंग आणि विवाद हे समीकरण तसे पाहायला गेले तर जुनेच आहे. मात्र आता मिका सिंग यानं ' 15 ऑगस्ट को हमारा हिंदुस्थान आझाद हुआ और 14 ऑगस्ट को हमारा पाकिस्तान' असे विधान करुन नवीन वाद ओढवून घेतला आहे. 'हमारा पाकिस्तान' असे विधान करुन अडचणीत आलेल्या मिका सिंगला सोशल मीडियावर चहुबाजूंनी सर्वांच्या क्रोधाचा सामना करावा लागत आहे.
या प्रकरणात आता शिवसेनेनं उडी घेत मिका सिंगला सल्लावजा इशारा दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानचा 'हमारा' असे उल्लेख करणा-या मिका सिंगला असा सल्ला दिला आहे की, कलाकारांनी व्यावसायिक लाभासाठी देशभक्तीसोबत तडजोड केली नाही पाहिजे. भारतात अशांतता निर्माण करू पाहणा-या पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारे नातेसंबंध ठेवणे चुक आहे आणि तसे करण्यात येऊ नये.
काय आहे नेमके प्रकरण?ट्विटरवरील एक व्हिडीओमध्ये मिका सिंगनं 'हमारा पाकिस्तान' असे विधान केले आहे. यावरुन हा सर्व वाद निर्माण झाला आहे. मिका सिंग 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिकांसाठी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओ पोस्टमध्ये मिका लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती देताना दिसत आहे. यादरम्यान मिकानं असेही म्हटले की , '15 अगस्त को हमारा हिंदुस्तान आजाद हुआ था और 14 अगस्त को हमारा पाकिस्तान.' या विधानावरुन सोशल मीडियावर सर्व स्तरातून मिका सिंगवर टीका केली जात आहे.
मनसेचाही मिकाला इशारादरम्यान, मनसेकडून मिकाला इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानचे गोडवे गाणा-या मिकानं महाराष्ट्रात माइक धरुन दाखवावा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
Be ready to rock with me ..Housten and chicago.... I'm coming to rock you guys Jai hind:) pic.twitter.com/nTbvpF1g7P
— King Mika Singh (@MikaSingh) August 1, 2017