नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला. शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील मतभेत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली . तसेच मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चौबे (बिहार), वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश) शिवप्रताप शुक्ल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्याबरोबरच गजेंद्रसिह शेखावत, मुंबईचे माजी पोलीस प्रमुख सत्यपाल सिंह आणि कन्ननथनम अल्फोन्स हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह आणि माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राजधानीत मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल होणार असतानाच, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची मागणी केल्याने पक्षनेते व मंत्र्यांना धक्का बसला होता. परराष्ट्र खाते सोडून संरक्षण मंत्रिपद स्वीकारण्यात मला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले होते.पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारावा, असा सल्ला स्वराज यांनी दिला. आधी अनेक पंतप्रधानांनी परराष्ट्र खाते सांभाळले आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्रालय आपल्याकडे ठेवल्यास या खात्याला तीन राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक हरदीप सिंग पुरी असतील.पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव संरक्षणमंत्रिपदासाठी असले तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र त्यांच्यासह पीयूष गोयल यांना पदोन्नती मिळाली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेचा नाराजीचा सूर, शपथविधीला अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 10:10 AM