शिर्डी : राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादऐवजी संभाजीनगर ही नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरकारची नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली.
पटेल यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. पटेल म्हणाले की, समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा निघेल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही. भंडारा येथील रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.