बिहारच्या बेगुसरायमध्ये विचित्र लग्न लागले आहे. बेगुसराय नगर पालिकेचे उपायुक्त शिव शक्ती कुमार यांनी नात्याने भाची लागणाऱ्या तरुणीशी लव्ह मॅरेज केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून उपायुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. एकीकडे नातेवाईक नाराज असताना दुसरीकडे तरुणीने आता काहीही झाले तरी निर्णय बदलू शकत नाही, असे म्हटले आहे.
भाची सजल सिंधू हिच्याशी शिवशक्ती यांनी खगडियाच्या कात्ययनी मंदिरात जाऊन हिंदू धर्मानुसार लग्न केले आहे. दोघांनी लव्ह मॅरेज केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. याचवेळी १३ ऑगस्टला वैशाली जिल्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विचित्र लग्नामुळे चर्चेत आलेल्या या जोडप्याने आपली प्रेमकहानी सांगितली आहे. ते दोघे गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना ओळखतात व एकमेकांवर प्रेम करतात. सजलचे वडील प्रोफेसर होते, ती मनुआमध्ये राहत होती. २०१५ मध्ये इंटरच्या शिक्षणासाठी ती वाराणसीला गेली होती, तिथेच शिवशक्तीसोबत ओळख झाली. २०२३ मध्ये सजलच्या वडिलांचे निधन झाले आणि तिला शिवशक्ती यांनीच आधार दिला. अखेर या दोघांनी १४ ऑगस्टला लग्न केले. आता आव्हान पाहून आम्ही आमचा निर्णय बदलू शकत नाही, प्रेम केले, लग्न केले. यात कोणती मोठी गोष्ट नाही, असे सजलने म्हटले आहे.
या दोघांना त्यांच्या नातेवाईकांपासून धोका आहे, यामुळे या दोघांनी सरन्यायाधीश, बार काऊन्सिल आणि मानवाधिकार आयोगाकडे संरक्षण मागितले आहे. बेगुसरायच्या महापौर पिंकी देवी यांनी सांगितले की, प्रेम करणे त्यांचा अधिकार आहे. परंतू शिवशक्ती यांनी कार्यालयाचा दुरुपयोग केला आहे, यामुळे त्यांना निलंबित करून उत्तर मागविण्यात आले आहे.