किल्ले 'शिवनेरी'च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा, अमोल कोल्हेंची संसदेत शिवगर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 05:21 PM2019-12-10T17:21:23+5:302019-12-10T17:22:25+5:30
खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात छत्रपती शिवरायांचे नामस्मरण करुन
नवी दिल्ली - शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करण्याची मागणी संसदेत केली. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी करत मंगळवारी संसदेत शून्यप्रहारामध्ये अमोल कोल्हेंनी लोकसभेत शिवगर्जना केली.
खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात छत्रपती शिवरायांचे नामस्मरण करुन आपले लक्ष्य वेधले होते. तसेच, बैलगाडा शर्यतीची मागणीही त्यांनी लावून धरली होती. त्यानंतर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात, कोल्हे यांनी शिवसृष्टीची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. तसेच, रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालनाही मिळेल, असे म्हणत अमोल कोल्हेंनी आपला मुद्दा लावून धरला.
आबाल-वृद्ध, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करून द्यावी, अशीही आग्रही मागणी कोल्हेंनी संसदेत केली. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ला हा मराठीजनांसाठी स्फुर्तीस्थान असून जगभरातील शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान मानले जाते.