ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - मुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. हे लोकांनी मान्य केल्यास देशातील समस्या सुटण्यास सुरुवात होईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ज्या राज्याकडे, समाजाकडे आपल्या इतिहासाचे संवर्धन करण्यास वेळ नाही तो प्रदेश आपल्या भूगोलाचे संरक्षण करु शकत नाही असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. उत्तरप्रदेशचे राज्यपाल रामनाईक आणि आदित्यनाथ यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे असे आदित्यनाथ म्हणाले.
लोक जेव्हा ख-या इतिहासापासून प्रेरणा घेतील तेव्हा आपल्याला आयएसआय, इसिस किंवा अन्य अशा प्रकारच्या संघटनांपासून घाबरुन राहण्याची गरज उरणार नाही असे आदित्यनाथ म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याचे कौतुक केले.