मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उत्कृष्ट संसदपटू खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. ईडी आणि सीबीआय या संस्थांकडून राज्यातील नेत्यांवर, त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख करत लोकसभेत आवाज उठवला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करत, केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. सुप्रिया सुळेंनी त्याचाच संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान भाजपवर टिकास्त्र सोडले. शिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. शिवरायांनी आपल्या लढाईत कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी-सीबीआयच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य केलं जात असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी
भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली. या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. तसेच, आक्रमकांनी काशीवर अनेक आक्रमणे केली. शहराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धर्मवेडाने झपाटलेल्या औरंगजेबाने तलवारीच्या धाकावर येथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगावेगळी आहे. येथे औरंगजेब आला तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराज या भूमीत जन्मतात, असे म्हणत छत्रपतींचा गौरवशाली इतिहास मोदींनी सांगितला होता.