नवी दिल्ली - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय.
देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी या उत्सवातून सामाजिक भान जपलं जातं. महाराजांच्या उंचच उंच मूर्तीची पुजा होते, अश्वारुढ पुतळ्यांच मिरवणूकही निघते. तर, अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांची प्रतिमा साकारतात. महाराजांना देशभरातून अभिवादन होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी जयंतीदिनी शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केलं आहे.