शिवपुत्र शंभूराजे महानाट्याचा थाटात प्रारंभ हत्ती, घोडे ठरले आकर्षण : शिवराज्याभिषेकाने डोळ्यांचे पारणे फेडले
By admin | Published: January 25, 2016 12:10 AM
जळगाव : शिवपुत्र शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचा रविवार, २४ रोजी खान्देश सेंट्रलच्या मैदानावर थाटात प्रारंभ झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या महानाट्याच्यानिमित्ताने जळगावकरांनी अनुभवला.
जळगाव : शिवपुत्र शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचा रविवार, २४ रोजी खान्देश सेंट्रलच्या मैदानावर थाटात प्रारंभ झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट या महानाट्याच्यानिमित्ताने जळगावकरांनी अनुभवला. प्रारंभी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संयोजक प्रितेश ठाकूर, दिग्दर्शक महेंद्र महाडिक, अभिषेक रत्नपारखी, विनय पारख, नगरसेविका सीमा भोळे यांची उपस्थिती होती. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी यांची आरती करण्यात आली. शिवशंभूशाहिर महेंद्र महाडिक यांनी या कथेचा नायक छत्रपती संभाजी यांचा जीवनपट उलगडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा विजयी अश्व चौफेर उधळत असताना छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सोहळा सुरु झाला. १३० फुटाचा भव्य रंगमचावर मराठा साम्राज्य, दिल्लीचा बादशहा औरंगजेब यांच्या दरबाराचे हुबेहुब वर्णन करण्यात आले होते. ८० फुट लांब व ५५ फुट उंच किल्ल्याची सरकती व फिरती हुबेहुब प्रतिकृती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. शंभू राजे यांच्या पात्राशी सुसंगत हत्ती, घोडे, उंट व बैलगाडीचा वापर हा छत्रपतींच्या साम्राज्यांचे दर्शन घडवित होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्यावेळी करण्यात आलेली विद्युत रोषणाई व फटाक्यांची नेत्रदीपक आतशबाजी लक्ष्यवेधी ठरत होती. त्र्यंबकराव वाडकर पितापुत्रांचे कटकारस्थान आणि स्वराज्यावर आलेले संकट परतावून लावताना शंभूराजे यांच्यावर झालेला अपहरणाचा आरोप हा प्रसंग कलाकारांच्या अभिनयाची कसोटी ठरला.छत्रपती संभाजी राजे आणि दिलेर खान यांची भेट. त्यानंतर भोपाळच्या स्वारीत मराठे आणि मोगल यांच्या तलवारींच्या खणखणाट प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करीत होते. तोफांचा गडगडाट आणि अग्निबाणांच्या वर्षावात घनघोर रणसंग्राम युद्धाची भयावह स्थिती दर्शवित होती.त्यातच शिवाजी महाराज यांनी संभाजी राजे यांना रायगडावर परत येण्यासाठी पाठविलेला निरोप आणि त्याला सोयराबाई यांचा विरोध हा प्रसंग लक्षवेधी ठरला. महानाट्याच्या रंगमंचावर ३०० शिवप्रेमी कलाकारांनी वातावरण भारावून गेले. चौकटमहानाट्याच्या निमित्ताने प्रवेशद्वारावरच श्रोत्यांनी आणलेले जुने कपडे, शैक्षणिक साहित्य, स्वेटर तसेच घरातील औषधी संकलित करण्यात येत होती. प्रेक्षकांनी आणलेले हे साहित्य आदिवासी भागात वाटप करण्यात येणार आहे.