वाराणसी: ज्ञानवापी मशिदीत जिथे शिवलिंग सापडले, ती जागा तत्काळ सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने सोमवारी दिले. हिंदू याचिकाकर्त्यांनी केलेला अर्ज स्वीकारल्यानंतर वाराणसीचे दिवाणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला की, मशिदीत जिथे शिवलिंग सापडले, ती जागा तत्काळ सील करण्यात यावी. त्या जागेच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी वाराणसीचे जिल्हाधिकारी, सीआरपीएफचे कमांडंट, पोलीस आयुक्त यांच्यावर असेल.
ज्ञानवापी मशिदीमध्ये वजूखाना आहे, त्या ठिकाणी हे शिवलिंग सापडले आहे असे पाच हिंदू महिला याचिकाकर्त्यांनी त्यांचे वकील हरिशंकर जैन यांच्यामार्फत वाराणसी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, सर्वेक्षणाबद्दल दोन्ही बाजूंचे पक्षकार समाधानी आहेत. याचा अहवाल १७ मे रोजी न्यायालयाला सादर होईल. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील पावले उचलण्यात येतील.
माहिती कोणी फोडली?
सर्वेक्षणात सापडलेली माहिती गोपनीय आहे. कोर्टाने सर्वेक्षणावर देखरेखीसाठी नेमलेल्या वकिलांची एक समिती नेमली. त्यातील एकाने सर्वेक्षणातील काही माहिती उघड केली. हे कृत्य कोर्टाच्या आदेशाविरुद्ध आहे. (वृत्तसंस्था)