भोपाळ : मध्य प्रदेशच्या आरोग्य आणि पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहदेळे यांना भीक मागणाऱ्या एका लहान मुलाला लाथ मारून धुडकावून लावणे चांगलेच महागात पडू शकते. मेहदेळे यांच्या अशाप्रकारच्या असंवेदनशील वर्तनाची चहूबाजूंनी निंदा होत असतानाच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नाराजीही त्यांना झेलावी लागू शकते. चौकशीअंती याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे संकेत चौहान यांनी दिले आहे. खुद्द मेहदेळे यांनी मात्र आपण कुठल्याही मुलाला लाथ मारलीच नसल्याचे सांगून स्वत:चा बचाव चालवला आहे.मेहदेळे यांनी एका कार्यक्रमात भीक मागणाऱ्या मुलाला मदत देण्याऐवजी लाथ मारून दूर झिडकारले होते. मेहदेळे यांचा हा उर्मटपणा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर मानवाधिकार कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष काँग्रेसने मेहदेळे यांच्या या क्रूर वर्तणुकीचा निषेध चालवला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारीही काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी मेहदेळे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
महिला मंत्र्यावर शिवराजसिंह नाराज
By admin | Published: November 03, 2015 2:11 AM