भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाने भोपाळमध्ये आयोजित केलेल्या शंखनाद रॅलीमध्ये केजरीवाल यांनी हा घणाघात केला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व 230 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,"सुमारे 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांची सत्ता आहे. एखाद्या सरकारसाठी 15 वर्षे खूप असतात. पण या 15 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांनी कुठले एक चांगले काम केले असेल तर सांगा. मध्य प्रदेशात शिक्षक सुखी आहेत का, विद्यार्थी खूश आहेत का, महिला, शेतकरी, आदिवासी, व्यापासी सुखी आहेत का. मध्य प्रदेशमधील सर्वसामान्य जनता दु:खी आहे." केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीची अवस्थासुद्धा अशीच होती. 15 वर्षे शीला दीक्षित यांचे सरकार होते. लोक दु:खी होते. मग अण्णांचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातून आपचा जन्म झाला. "काँग्रेस-भाजपाची जुगलबंदी तोडण्याचे दिल्लीकरांनी निश्चित केले आणि एका नव्या राजकारणाचा जन्म झाला. आज दिल्लीची जनता सुखी आहे." गेल्या दीड वर्षांत दिल्लीमध्ये जेवढी विकासकामे झाली आहेत तेवढी गेल्या 70 वर्षांत कुठल्याही शहरात झालेली नाहीत, असा दावाही केजरीवाल यांनी केला. मध्य प्रदेशची चर्चा सुरु झाल्यावर सर्वप्रथम डोक्यात व्यापम घोटाळा येतो, असा टोलाही केजरीवाल यांनी हाणला."शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील 8 कोटी जनतेचा अपमान केला आहे. व्यापम घोटाळ्यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी तरुण-तरुणींची हत्या केली गेली. मध्य प्रदेश संपूर्ण जगात भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. तर दिल्लीमधील आपच्या सरकारचे उदाहरण प्रामाणिक सरकार म्हणून दिले जाते. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिजिंलेंस कमिशनने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये 67 टक्के भ्रष्टाचार वाढल्याचे तर दिल्लीच्या आप सरकारमध्ये 81 टक्के भ्रष्टाचार कमी झाल्याचा उल्लेख आहे."असेही केजरीवाल यांनी सांगितले.
शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 8:39 PM