भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला होत आहे. या फोटोत शिवराजसिंह जेवण करत असून त्यांच्या ताटात नॉनव्हेज/चिकन दिसून येते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचा जोर वाढल्याने जाणीवपूर्वक शिवराज सिंह यांचा फोटो मॉर्फ करून खोटी माहिती पसरवली जात आहे.
मध्य प्रदेशमधील अनेक फेसबुक अकाऊंटवरुन शिवराज सिंह यांचा जेवण करतानाचा हा फोटो शेअर होत आहे. तसेच, एक कट्टर हिंदू असून तुम्ही चिकन/मटन यांसारखे पदार्थ खाता. तुम्ही ढोंगी आहात, असे कॅप्शनही या फोटोसह देण्यात येत आहे. मात्र, शिवराजसिंह यांचा हा फोटो मॉर्फ केलेला असून त्यांच्या ताटातील पदार्थ जाणीवपूर्वक बदलण्यात आले आहेत. त्यामुळे, निवडणुकांच्या तोंडावर शिवराज सिंह यांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे दिसून येते.
गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये या फोटोचा शोध घेतला असता वेगळेच सत्य बाहेर आले आहे. कारण, शिवराज सिंह 17 नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरमध्ये जेवण करतानाचा हा फोटो आहे. यावेळी त्यांच्या थाळीत सर्वच पदार्थ व्हेज असल्याचे दिसत आहे. द ट्र्युबन या वेबसाईटने याबाबतची बातमी केली होती. त्यामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान जेवणासाठी शिवराज सिंह यांनी विश्रांती घेतली होती. त्यावेळी चक्क हेलिकॉप्टरमध्येच त्यांनी जेवण केलं. विशेष म्हणजे शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण त्यांनी आपल्यासोबत घेतलं होतं. मात्र, या फोटोला निवडणुकांचा अजेंडा बनवून वेगळ्याच पद्धतीने व्हायरल करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी कर्नाटकमधील निवडणुकांवेळीही सौम्या रेड्डी यांचा असाच नॉनव्हेज खातानाचा फोटो व्हायरल करण्यात आला होता.