नवी दिल्ली - दिवाळीपूर्वी मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात चीनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने "चीनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीवर विना परवाना पूर्णपणे बंदी आहे. तसेच डायरेक्ट जनरल फॉरेन ट्रेडद्वारे (डीजीएफटी) चीनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीसाठी कोणतेही परवाने देण्यात आलेले नाहीत असं स्पष्ट केलं आहे.
मध्यप्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजौर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी आणि अन्य परदेशी फटाक्यांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कायद्याचं उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी यासंदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं.
आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचं केलं आवाहन
बैठकीमध्ये चीनी फटाके आणि त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्य़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा वापर केल्यास संबंधितांवर ‘एक्स्प्लोसिव्ह अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं. दिवाळीदरम्यान मातीच्या पणत्यांची खरेदी करा जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी
राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी, फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर फिटनेस शिवाय धूर सोडणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश गेहलोत सरकारने दिले आहेत.
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कोरोनाग्रस्तांसाठी ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
दिवाळी फटाके वाजवले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात फटकांमुळे होणारं प्रदूषण हे रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. फटाक्यांमुळे होणारा धूर आणि प्रदूषण हे सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राजस्थान राज्य मानवाधिकार आयोगाने फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच डॉक्टरांनी कोरोना काळात फटाक्यांचा वापर टाळण्याबाबत इशारा दिला आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धूरामुळे, त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे, कोरोनाग्रस्त आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो असल्याचं म्हटलं आहे.