शिवराजसिंह चौहान बनले नायकमधील अनिल कपूर, जनतेमधून थेट कमिश्नरांना फोन लावला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:44 PM2022-05-18T21:44:17+5:302022-05-18T21:44:52+5:30
Shivraj Singh Chouhan News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले.
भोपाळ - मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाण्याची समस्या अनेक परिसरांमध्ये अद्यापपर्यंत सुरळीत होऊ शकलेली नाही. दरम्यान, स्थानिकांनी या समस्येची तक्रार थेट मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि पाण्याची व्यवस्था केली.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. त्यांचा ताफा न्यू शबरीनगर येथून गेला. तेव्हा त्यांनी काही लोकांना पाण्यासाठी त्रस्त असलेले पाहिले. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी आपला ताफा थांबवला आणि ते जनतेमध्ये पोहोचले. तिथून त्यांनी महापालिकेचे आयुक्त व्ही. एस. चौधरी यांना फोन केला. चौहान म्हणाले की, मी एका कार्यक्रमाला जात आहे. तिथून अर्ध्या तासात परत येईन. तोपर्यंत या परिसरातील पाण्याची समस्या सुटली पाहिजे. एवढं सांगून शिवराज सिंह चौहान तिथून रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचा पोन आल्यानंतर संपूर्ण प्रशासन न्यू शबरीनगर येथे पोहोचले. त्यानंतर तेथील जनतेच्या पाणी प्रश्नाची सुटका करण्यात आली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे पुन्हा पोहोचले. तोपर्यंत तेथील पाणीप्रश्न सुटला होता. त्यानंतर येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच ही समस्या कायमची सोडवण्यासाठी परिसरात बोरिंग देण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना तत्काळ तसे आदेश दिले.