नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी जवानांच्या या शौर्याला सलाम केला आहे. ते म्हणाले, 'दहशतवाद मुळापासून उखडण्याचे अभियान सुरु झाले आहे. भारताकडे कोणी वाईट नजरेने पाहिले, तर त्याचा परिणाम जैशच्या दहशतवाद्यांचा झाला आहे, तसाच होईल. भारतीय वायु सेना आणि आमच्या जवानांच्या शौर्याला सलाम.'
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने पूर्ण केली आहे.