भोपाळ, दि. 19 - 2018 मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. शिवराज सिंग निवडणुकीत मुख्य चेहरा असतील हे अमित शाह यांनी जाहीर केलं असल्यामुळे इतर चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी काही पत्रकारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी हे स्पष्ट केलं. '2018 विधानसभा निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल हे मी स्पष्ट करु इच्छितो', असं अमित शाह बोलले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंग चौहान यांना भाजपाध्यक्ष दिल्लीला बोलावून केंद्रीय मंत्रीपद बहाल करणार असल्याची चर्चा सुरु होती. या पार्श्वभुमीवर अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. शिवराज सिंग चौहान यांनी याआधीही आपण केंद्रात जाणार नाही आहोत असं स्पष्ट करत वृत्त फेटाळलं होतं. 'या सर्व अफवा आहेत. मी येथेच थांबून पक्षाला सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मदत करणार आहे', असं शिवराज सिंग चौहान बोलले होते.
अमित शाह यांना यावेळी मात्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंग चौहान यांच्यावर भाष्य करणं टाळलं. नंदकुमार सिंग चौहान यांचा कार्यकाळ वाढवण्यात येणार आहे का ? असं विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. नंदकुमार सिंग चौहान यांनी नुकतीच तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी हा किमान कार्यकाळ आहे.
दुस-या एका कार्यक्रमात बोलतानाही अमित शाह यांनी शिवराज सिंग चौहान सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसारख्या भाजपशासित राज्यांवरील आळशी हा टॅग हटवण्यात यश मिळाल्याचं ते बोलले आहेत. 'विधानसभा निवडणुकीत आम्हाला 200 जागांची अपेक्षा आहे. तसंच लोकसभा निवडणुकीतही सर्वच्या सर्व 29 जागा जिंकू', असा विश्वास अमित शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना अमित शहा यांनी आपण कधीच केंद्रीय मंत्रीपद घेणार नसून फक्त पक्षासाठी काम करणार असल्याचंही स्पष्ट केलं. 'गुजरातमधील माझा आमदारपदाचा कार्यकाळ संपत आला आहे, म्हणून मी राज्यसभेचा पर्याय निवडला. आता मी फक्त पक्षासाठी काम करणार आहे. मी पक्षात राहीन पण कधीच केंद्रीय मंत्रीमंडळात जाणार नाही. हे मी अधिकृतपणे जाहीर करत आहे', असं अमित शाह बोलले आहेत.