नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या मैदानात उतरुन प्रत्येक राजकीय नेता एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या बोलण्याचालण्यावरही बारीक लक्ष ठेऊन आहेत. याच पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही राहुल गांधींना त्यांची वागण्याची पद्धत जाहीररित्या सांगत त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडासा वेळ काढत येथील प्रसिद्ध '56 दुकान' या खाद्यपदार्थांच्या ठिकाणाला भेट दिली. येथे त्यांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. त्यांच्यासोबत कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधियादेखील होते. यावेळेस राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं कमलनाथ यांना हाक मारली, त्यावरुन शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत.
आईस्क्रीमच्या दुकानात राहुल गांधींनी म्हटले की, 'कमल, आइसक्रीम बहुत अच्छी है, तुम भी खाओ.' यावरुन शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला. ''आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला ते अशा पद्धतीनं कशी काय हाक मारू शकतात'',असा प्रश्न उपस्थित करत चौहान यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. कमलनाथ यांनी त्यांच्या वडिलांसोबत (राजीव गांधी) काम केले आहे. 70-75 वर्षांच्या व्यक्तीला त्यांच्या नावानं हाक मारणं, ही भारतीय संस्कृती आहे?, असे प्रश्न विचारत चौहान यांनी राहुल गांधींना फटकारलं आहे.
(राहुल गांधींचा यू-टर्न, म्हणे, शिवराज यांच्या मुलाच्या नावामध्ये कन्फ्युज झालो)
यापूर्वीही चौहान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधींनी चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडले. राहुल गांधींच्या टीकेमुळे संतप्त झालेले शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.
दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण कन्फ्युज झाल्याने शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण दिले होते. "मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात होतो. खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव केली.
सोमवारी राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहानांवर हे आरोप केले होते. मामाजींच्या मुलाचं पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव समोर आले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होते. पाकिस्तानसारख्या देशाने त्यांना तुरुंगात डांबले, परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. दरम्यान, राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. "जर कुणी कनिष्ठ नेत्याने असा आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खुद्द काँग्रेस अध्यक्षानीच अशाप्रकारचे आरोप लावणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले.