इंदूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. असे असताना, भाजपाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मोठा धक्का बसला आहे. शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ यांच्या बाजूने लॉबिंग सुरु केले. यावेळी संजय सिंह म्हणाले, मध्य प्रदेशात आता शिवराज नाही तर कमलनाथ यांची गरज आहे. शिवराज यांचे राज भरपूर झाले. त्यांनी 13 वर्षे सत्ता सांभाळली. आता कमलनाथ यांना मिळाली पाहिजे.
मध्य प्रदेशात गुंतवणूकदारांच्या अनेक बैठकी झाल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहेत. कमलनाथ यांनी छिंदवाडा भागात केलेली विकास कामे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनता कमलनाथ यांची वाट पाहत आहेत, असेही संजय सिंह यांनी सांगितले. याचबरोबर, ज्याप्रकारे भाजपामध्ये निष्ठेने सेवा केली. त्याच भावनेने संजय सिंह काँग्रेसमध्ये करतील, असे कमलनाथ यांनी सांगितले.