भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख गुन्हेगार (क्रिमिनल) असा केल्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी त्यांचा निषेध केला आहे. नेहरू यांच्या पायाची धूळ चाटण्याचीही चौहान यांची लायकी नाही, असे वक्तव्य करणाऱ्या चौहान यांची आम्हाला लाज वाटते, अशी टीका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.चौहान यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणीही दिग्विजय सिंह यांनी केली. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने अशी भाषा करणे दुर्दैवी व अशोभनीय आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. चौहान यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका काँग्रेसचे नेते लखन सिंह यांनीही केली आहे. भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान यांनी पं. नेहरू यांचा उल्लेख क्रिमिनल असा केला होता. भारतीय लष्कर जेव्हा पाकिस्तानी घुसखोरांना मागे हटवत होते, तेव्हा नेहरू यांनी युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात राहिला. अन्यथा तो आज भारतात आला असता आणि संपूर्ण काश्मीरच भारताचे झाले असते, असे ते म्हणाले. नेहरू यांनी ३७० कलम लागू करून भारतावर अन्याय केला, असेही उद्गार चौहान यांनी काढले. (वृत्तसंस्था)
आक्षेपार्ह व निंदनीयमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही चौहान यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी संघर्ष केला, ज्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटले जाते, त्यांना गुन्हेगार म्हणणे निंदनीय आहे. नेहरू यांच्या निधनानंतर ५५ वर्षांनी त्यांच्याविषयी असे उद्गार काढणे आक्षेपार्ह आहे. पं.जवाहरलाल नेहरू यांचे योगदान भारतीय विसरूच शकत नाहीत.