राज्ये हातातून गेल्यास शिवराजसिंह, रमणसिंह, राजे केंद्रीय मंत्रिमंडळात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:21 AM2018-12-11T06:21:31+5:302018-12-11T06:22:29+5:30
भाजपाच्या वर्तुळात चर्चा; निकालानंतर स्पष्ट होणार भवितव्य
- असिफ कुरणे
भोपाळ : एक्झिट पोलमधून राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशात भाजपाच्या सत्तेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या, मंगळवारी लागणार आहेत. एक्झिट पोलनुसारच तीन राज्यांत निकाल लागले, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे रमण सिंग आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा जोरात आहे. ही चर्चा सध्या जत-तरची आहे, हेही खरेच.
लोकसभा व काही राज्यांच्या निवडणंकांना पाच महिने शिल्लक आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये फटका बसल्यास लोकसभांना कसे सामोरे जायचे, यादृष्टीनेही भाजपाने तयारी सुरू केली आहे. केंद्रीय नेतृतृत्वाने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षसंघटना रिचार्ज करण्याचे धोरण स्वीकारल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. त्याच भाग म्हणून पराभव झाल्यास छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रात घेण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील त्यांचे काम, संघटन कौशल्य पाहत मंत्रीपद देत लोकसभेसाठी त्यांना राज्याची जबाबदारी देण्याचे नियोजन आहे.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्यांची संख्या जास्त आहे. अनंत कुमार यांचे आकस्मित निधन, मनोहर पर्रिकर यांची गोवा वापसी यामुळे संघाला नव्या पर्यायांची गरज आहे. शिवराज सिंह चौहान, रमण सिंग व वसुंधराराजे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर त्यांच्या अनुभवाचा, कौशल्याचा पक्षाला फायदा होईल असे पक्षश्रेष्ठींने वाटते. या तिघांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास त्यांच्यासाठी सहा महिन्यांत कोणत्याही सभागृहावर निवडून यावे लागेल. अर्थात सहा महिन्यांत लोकसभा निवडणुका होतील. त्यामुळे अडचणी येणार नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात वा ते संपताच छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत
नाही.
प्रभावी चेहऱ्यांची गरज
२०१४ च्या तुलनेत भाजपकडे प्रसिद्ध चेहºयांची वानवा आहे. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, उमा भारती, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, र्कीती आझाद अशी नेत्यांची तगडी फळी होती. पण आता यातील अनेक जण पक्षापासून लांब गेले आहेत, तर सुषमा स्वराज, उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्हाला या तीन मुख्यमंत्र्यासारखे प्रभावी नेते केंद्रात लागतील, असे एका भाजपा नेत्याने सांगितले.