श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं बुधवारी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला. यावेळी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या सहा ते नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, थोड्यावेळाने त्यांची सुटका करण्यात आली.
27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं. तुम्ही लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिरबाबत बोलतात असं अब्दुल्ला म्हणाले होते. काही शिवसैनिक आज लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी फारूक अब्दुल्लांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. तिरंगा फडकावण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. थोड्यावेळाने त्यांची सुटका करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोठीबाग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. ते सर्व जम्मूचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिंपी कोहली आणि सरचिटणी मनिष साहनी यांनी यापूर्वी “शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार आहे. यासाठी पक्षाचं एक विशेष पथ काश्मीरला रवाना झालं आहे,” अशी माहिती दिली होती.