नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवाची चाहुल लागल्यानंतर शिवसेनेने टीका करण्याची आयती संधी साधली. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिनिधित्त्व केलेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात भाजपाचा पराभव निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपावर टीकेची तोफ डागली. त्यांनी म्हटले की, मला वाटत नाही की उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत सपा आणि बसपाची युती निर्णायक ठरली. माझ्या मते ज्यादिवशी भाजपाने श्रीरामाचा अपमान करणाऱ्या सपाच्या नेत्याला (नरेश अग्रवाल) लाल गालिचे अंथरून पक्षात प्रवेश दिला, तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला होता, असे राऊत यांनी म्हटले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील तीन जागांवरील पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर होत आहेत. या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. फुलपूरमध्ये ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, 'सपा'कडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात आहेत.