नवी दिल्ली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करून देशभरात चर्चेत आलेले भाजपा खासदार ब्रूजभूषण सिंह मुंबईत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ब्रूजभूषण सिंह यांची भेट घेऊन त्यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिले. दिपाली सय्यद सातत्याने राज ठाकरे आणि मनसेवर कडाडून टीका करत असतात. त्यात राज यांच्या अयोध्या दौऱ्याला ज्यांनी विरोध केला त्यांना मुंबईत बोलावून दिपाली सय्यद यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
बृजभूषण सिंह यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद म्हणाल्या की, भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह म्हणजे डॅशिंग माणूस जो बोलतो ते करतो. महिला महाराष्ट्र केसरी लवकरात लवकर व्हावी यासाठी भेट घेतली. लवकरच ते मुंबईत येणार आहेत. ब्रिजभूषण सिंह यांची भेट करून दिल्याबद्दल सय्यद यांनी शरद पवारांचे धन्यवाद मानले आहेत.
राज यांनी केला होता अयोध्या दौरा रद्दमी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला असं स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना केले होते. यावर राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली होती. केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही. मोदींचे कौतुक करून काय भेटणार, बृजभूषण काय तुमच्यासारखे भूमिका बदलत नाही असा निशाणा त्यांनी साधला होता.
काय आहे प्रकरण?मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर ५ जून रोजी अयोध्येत जात प्रभू रामाचं दर्शन घेणार असल्याचं जाहीर केले होते. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध करत त्यांच्याविरोधात रॅली, सभा आयोजन केले. राज ठाकरे माफी मागत नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. इतकेच नाही तर राज ठाकरे उंदिर आहे. त्यांचा बापही अयोध्येत येऊ शकत नाही अशाप्रकारे चिथावणी देणारी विधानं बृजभूषण सातत्याने करत राहिले. मात्र अयोध्या दौऱ्याचा विरोध हा ठरवून केलेला ट्रॅप आहे. त्यात मनसे कार्यकर्त्यांना अडकवण्याचा डाव होता असं सांगत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला होता.