मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदींची जादू ओसरली आहे. तर राहुल गांधी अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि याला मोदी जबाबदार असतील, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये असलेल्या लेखात म्हटलं आहे. देशातील सध्याची परिस्थिती भाजपासाठी अनुकूल नाही. तीन राज्यांमधील जनतेनं भाजपाविरोधात कौल दिला आहे, असं राऊत यांनी त्यांच्या लेखात नमूद केलं आहे. भाजपाला बहुमत न मिळाल्यास गडकरींनी पंतप्रधानाची संधी असेल आणि सध्या गडकरी त्यांच्या विधानातून त्याचेच संकेत देत आहेत, असं त्यांनी लेखात म्हटलं आहे. 'भाजपाला 150च्या आसपास जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होऊ शकतात. त्यांच्या नावाला इतर नेतेही संमती देतील. अतिशय झपाट्यानं काम करणारे मंत्री अशी त्यांची मंत्रिमंडळात ओळख आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो,' असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक असलेल्या राऊत यांनी लेखातून पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. मोदींना 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र त्यांना ही संधी पूर्णपणे गमावली. 2014 मध्ये मोदींच्या समर्थनाची लाट होती. कारण काँग्रेसचा पराभव करण्याचा निश्चय लोकांनी केला होता. मात्र आता देशातील परिस्थिती बदलली आहे. मोदींची प्रतिमा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. राहुल गांधींची प्रतिमा मोदींइतकी मोठी नाही. मात्र आता त्यांना महत्त्व मिळू लागलं आहे. कारण मतदार सध्याच्या सरकारवर नाराज आहेत, असं विश्लेषण राऊत यांनी केलं आहे.
'भाजपाला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:22 PM