हैदराबाद - देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली. या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचेमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शिफारस केली होती. त्यानंतर, आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर करणारं परिपत्रक काढलं. त्यामध्ये, मिलिंद नार्वेकर यांना सदस्यपद देण्यात आला. त्यामुळे, नार्वेकर यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली.
आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या देवस्थानच्या ट्रस्ट सदस्यपदासाठी देशभरातून २४ सदस्यांची निवड केली जाते. त्या पदासाठी अनेक चढाओढ लागलेली असते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सदस्यपदासाठी नावं सुचवतात.
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी आंध्र प्रदेश सरकार आणि संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले होते. आता, आंध्र प्रदेशला जाऊन त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची सहकुटुंब भेट घेतली. तसेच, या नियुक्तीबद्दल त्यांचे आभारही मानले.
उद्धव ठाकरेंसोबत पहिली भेट
मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. एका सामान्य कुटुंबात जन्माला जन्मलेले मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी धडपडत होते. मुलाखत देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पहिल्याच भेटीत वाकचातुर्य पाहून उद्धव ठाकरेही प्रभावित झाले. नार्वेकरांचं एकंदरीत अनुभव आणि कौशल्य पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी सोपवायची याबाबत त्यांना विचारणा केली.