- सुरेश भुसारी नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या भाजप व शिवसेनेचे नाते तब्बल ३० वर्षांनी संपुष्टात आले आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचा सर्वात जुना सहकारी एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती केली होती. प्रमोद महाजन या युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जात. ही युती ३० वर्षांनी मात्र संपुष्टातआली.१९९८, १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना होती. दिल्लीत अकाली दल व शिवसेना हे दोनच पक्ष कायम भाजपसोबत राहिले होते. इतर पक्ष भाजपप्रणीत एनडीएतून आत-बाहेर होत राहिले; परंतु कोणत्याहीक्षणी शिवसेनेने कधीच भाजपची साथ सोडली नव्हती. सध्या शिवसेनेचे लोकसभेत १८ व राज्यसभेत ३ सदस्य आहेत. शिवसेनेच्या या निर्णयाने दिल्लीतील केंद्र सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही; परंतु पुढील राजकीय स्थितीमध्ये मात्र भाजपला शिवसेनेची उणीव भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.>अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामामहाराष्ट्रात भाजप व शिवसेना यांच्यातील युती मोडीत निघाल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.'मी राजीनामा दिला आहे, त्यातून तुम्हीच अर्थ काढा', असे सूचक वक्तव्य त्यांनी नंतर केले. अरविंद सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा पाठवला. सावंत सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याचे नमूद करून सावंत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेचे समान वाटप, या मुद्यावर चर्चा झाली होती. परंतु भाजप नेते आता नाकारत आहेत.अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. शिवसैनिक म्हणून माझ्यासाठी हे अत्यंत वेदनादायी आहे. अशा राजकीय स्थितीत केंद्रात मंत्री राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याने मी पदाचा राजीनामा दिला आहे.अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारल्याचे अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची जराही शक्यता नसल्याने सावंत यांच्या खात्याचा कारभार इतर मंत्र्याकडे सोपवण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.>राममंदिरावर शिक्कामोर्तब होताच तुटली युतीरामजन्मभूमीच्या मुद्यावर शिवसेना-भाजप एकत्र आले. राज्यात १९९५ साली युतीचे सरकारही स्थापन झाले. अयोध्येत राममंदिर उभारण्यावर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र युती संपली.
सेना ‘एनडीए’तून बाहेर; ३ दशकांचे नाते संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:18 AM