नवी दिल्ली - राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. तत्पूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींच्या प्रश्नाला सविस्तरपणे उत्तरे दिली होती. मात्र, जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं. तसेच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला आहे.
संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला 126 विमानांचा करार मोदी सरकारने 36 विमानांवर का आणला? या विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि 45 हजार कोटींचं कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट का देण्यात आलं?, असे रोखठोक सवाल करत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. राहुल यांच्या प्रश्नावर अर्थमंत्री जेटलींनी उत्तरे दिली. तसेच राफेल करारात कुठलाही घोटाळा नसून शस्त्रधारी विमानांची खरेदी केल्यामुळेच याची किंमत वाढल्याचं जेटली म्हणाले. मात्र, जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसून सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. सरकार पारदर्शक आहे ना, मग होऊ द्या जेपीसी असे म्हणत शिवसेनेनंही राफेल करारावरुन सरकारला आव्हान दिलं आहे.