अलाहाबाद - उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली असली, तरी सध्या महाराष्ट्रात धाकटा भाऊ म्हणून भूमिका बजावत असलेल्या शिवसेनेने या निवडणुकांमध्ये खाते उघडले आहे. अलाहाबादमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
शिवसेना उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काही महापालिकांमध्ये रिंगणात उतरली होती. त्यात अलाहाबादमध्ये वॉर्ड क्रमांक ४० मधून त्यांचे दीपेश यादव विजय झाले आहेत. उत्तर भारतातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेने असा विजय मिळविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
शिवसनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलाहाबादमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी तेथील सर्व उमेदवारांचे अभिनंदन केलं. काम करेंगे, दिल जीतेंगे!!! असे म्हणत ही एक सुरवात आहे! असल्याचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला तर करून दाखवलं! करून दाखवणार! असे विरोधकांना सांगितले.
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची आघाडी, काँग्रेसचा बालेकिल्ल्यात पराभव -
उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे. महापौरपदाच्या 16 जागांपैकी अयोध्या आणि आग्र्यातील जागेवर भाजपाचा कब्जा केला आहे, तर इतर 12 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बीएसपीनं अलिगड आणि मेरठमध्ये मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपाला विजय मिळाला आहे. नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच चार नगरपालिकेत कमळ उमललं आहे.