मुंबई, दि. 18 - नेहमी वादग्रस्त ट्विट करुन वादाच्या भोव-यात अडकणा-या शोभा डे यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. राहुल गांधींची खिल्ली उडवल्यामुळे ट्विटरकरांनी त्यांना चांगलंच फटकारलं. बुधवारी शोभा डे यांनी एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये राहुल गांधींचा उल्लेख केला होता. 'अशी कमी माहिती ठेवणा-या व्यक्तीवर आपण प्रेम केलं पाहिजे जो बंगळुरुमधील प्रत्येक शहरात असं म्हणतो. भारताला अशा बुद्धिवंत लोकांची गरज आहे', असं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं.
राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये केलेल्या भाषणाच्या पार्श्वभुमीवर शोभा डे यांनी हे ट्विट केलं होतं. भाषणादरम्यान राहुल गांधींकडून काही चुका झाल्या होत्या. राहुल गांधी इंदिरा कॅन्टीनच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र तिथे बोलताना त्यांनी चुकून इंदिरा ऐवजी अम्मा कॅन्टीन असा उल्लेख केला होता. याशिवाय अनेकदा इंदिरा कॅन्टीनच्या जागी इंदिरा कॅम्पेन असं बोलले. सोबतच कर्नाटकमधील सर्व शहरांमध्ये बोलण्याऐवजी बंगळुरुमधील सर्व शहरांमध्ये असंही बोलून गेले. राहुल गांधीच्या या भाषणावरुन अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.
मात्र शोभा डे यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवणं ट्विटकरांना रुचलेलं नाही. युजर्सनी राहुल गांधींचं समर्थन करत असं कोणासोबतही होऊ शकतं असं म्हटलं आहे. काहीजणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण दिलं आहे.
शोभा डे याआधीही अनेकदा वादग्रस्त ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल ट्विट केल्यानंतरही शोभा डे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. 'ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रियोला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे', असं ट्विट शोभा डेंनी केलं होतं. शोभा डेंच्या या ट्विटमुळे नेटिझमने त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
यापुर्वीही, मल्टिप्लेक्समधील किमान एका पडद्यावर ‘प्राइम टाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शोभा डेंनी ट्विटरवर उपरोधिक भाष्य केले होते.
महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर अनेकांकडून कौतुक होत असताना शोभा डे यांनी 'देवा या हुशार महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिकीकरण व लोभापासून वाचव, त्यामुळे पुरूष क्रिकेटपटू उद्ध्वस्त झाले आहेत' असे ट्विट केले होते.
दरम्यान, शोभा डेंच्या या टवि्टवर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त करत रिट्विट केले होते. यामध्ये काहीजणांनी शोभा डे सध्या महिला क्रिकेटपटूंच्या निमित्ताने स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. काहींनी 'देवा यूजलेस, वर्कलेस, पेज थ्री स्तंभलेखकांपासून आमच्या क्रिकेटपटूंचे रक्षण कर' असे ट्विट केले होते.
काही दिवसांपूर्वी शोभा डे यांनी ट्विटरवर मध्य प्रदेशमधील दौलतराम जोगावत या स्थूल पोलीस अधिका-याचे छायाचित्र पोस्ट करून मुंबई पोलिसांची खिल्ली उडविली होती. यावर शोभा डे यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.