सुनील चावके लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप आणि जनता दल सेक्युलर यांचे समीकरण जुळून आल्यास केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सर्वात विश्वासू, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा अनपेक्षित चेहरा ठरू शकतात.
कर्नाटकात भाजपची सारी भिस्त लिंगायत समाजाच्या मतांवर आहे. तशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी या लिंगायत नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची लिंगायत मतांवरील पकड खिळखिळी झाल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत भाजप-जद सेक्युलर संभाव्य युतीत वक्कलिग समाजाच्या ५६ वर्षीय शोभा करंदलाजे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
‘शोभाक्का’ ठरणार हुकमाचा एक्का? कर्नाटकच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या येदियुरप्पांच्या मनासारखे करण्याबरोबरच भाजपला भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरणारे लिंगायत-वक्कलिग समीकरण जुळवून आणण्याची संधीही ‘शोभाक्कां’मुळे मिळू शकते. अर्थात, काँग्रेसला बहुमताने हुलकावणी देऊन कर्नाटक विधानसभा त्रिशंकू झाली तरच ते शक्य आहे.