नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणाऱ्या बॉक्सर आणि सुवर्णपदक विजेत्या विजेंदर सिंगनेभाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदर सिंगनेकाँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे, विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विजेंदर सिंग यांनी सातत्याने मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेतली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो किंवा महिला कुस्तीपटूंचं आंदोलन असो, विजेंदर सिंगने ट्विटरवरुन भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी कालपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या पोस्ट रिट्विट केल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींना ट्रोल करणाऱ्या काँग्रेसच्या पोस्ट त्यांनी काल रिट्विट केल्या आणि आज भाजपाचा गमछा गळ्यात घातला.
मी पक्षांतर केलं असलं तरी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणणार आहे. मी भाजपामध्ये सहभागी होऊन अनेक खेळाडूंच्या भवितव्यासाठी काम करणार आहे, असेही विजेंदर सिंगने म्हटले. दरम्यान, विजेंदर सिंगने राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होत मोदी सरकारविरुद्ध आवाज उठवला होता. राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक करत, त्यांच्यासोबत यात्रेत पायी चाललाही होता.