आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची मागणी कोर्टाने आज फेटाळून लावली आहे. तसेच जामिन याचिकाही फेटाळण्यात आली आहे. अशातच आज दिल्लीचे मंत्री राज कुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे.
दिल्लीचे समाजकल्याण आणि कामगार मंत्री राज कुमार आनंद यांच्या घरी गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरला ईडीने छापेमारी केली होती. ७ कोटींहून अधिक रकमेच्या वस्तूंवरील सीमाशुल्काची चोरी आनंद यांनी केल्याची तक्रार होती. याविरोधात त्यांच्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने तक्रार दाखल केली होती. स्थानिक न्यायालयाने ही तक्रार पुरावे पाहून खरी असल्याचे म्हटले आहे.
आज मंत्रिपदाचा राजीनामा देताना आनंद यांनी पक्ष गेल्या काही काळापासून दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान देत नाही, असा आरोप केला आहे. दलितांना फसविण्यात आले आहे. अशात पक्षात राहणे कठीण बनत चालले आहे. यामुळे मी पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आनंद यांनी म्हटले आहे.
आप गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष आहे आणि मी भ्रष्ट लोकांच्या कामाबद्दल बोलू शकत नाही. हा काही टायमिंग नाहीय. कालपर्यंत आपल्याला अडकविले जात असल्याचे समजत होतो. परंतु उच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीतरी गडबड असल्याचे वाटू लागले आहे, असा आरोप आनंद यांनी केला आहे.