लोकसभा निवडणुकीत एकीकडे विजयाची शाश्वती नसतानाही अनेकजण तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावून असताना विजयाची शाश्वती असूनही गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे. दोन्ही उमेदवारांनी पक्षाला तिकीट परत केले आहे.
बडोद्याच्या खासदार रंजन भट्ट आणि साबरकांठाहून भीकाजी ठाकुर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे. भट्ट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली आहे. भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले होते. तर भीकाजी यांच्या जातीवरून वाद सुरु आहे. यामुळे त्यांनी निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले असल्याचे सांगितले जात आहे.
रंजन भट्ट यांनी ट्विटरवरून भाजपाचे तिकीट मागे देत असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात भाजपानेच आंदोलन छेडले होते. भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनीच हे आंदोलन छे़डले होते. याचा उल्लेख करत भट्ट यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले गेले असे म्हटले आहे. मला हायकमांडने काही सांगितलेले नसून मी स्वत: तिकीट परत करत आहे. अशाप्रकारे विरोध होण्यापेक्षा मी निवडणूक न लढवावी हेच चांगले आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
दुसरे उमेदवार भीकाजी ठाकूर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांना स्थानिकांमध्ये भीकाजी डामोर या नावाने ओळखले जाते. तिकीट मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित झाला होता. दोन वेळचे खासदार दीपसिंह राठोड यांचे तिकीट कापून भीकाजी यांना संधी देण्यात आली होती.