ऑनलाइन लोकमत -
कलबुर्गी, दि. 03 - अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीवर 10 वर्ष बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मारुती अमरेप्पा तारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बिदर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने मारुती तारेची सर्व संपत्ती जप्त करण्याचे तसंच पिडीत मुलीला 5 लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
34 वर्षीय मारुती तारे 2002 मध्ये सरकारी प्राथमिक शाळेत कामाला असताना पिडीत मुलगी आठवीमध्ये शिकत होती. मारुती तारे नेहमी पिडीत मुलीचा पाठलाग करत असे. मारुती तारेचं लग्न झालेलं असतानादेखील त्याने पिडीत मुलीच्या घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मारुती तारेला दोन मुलंही होती. पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी मात्र लग्नाचा प्रस्ताव फेटाळत मुलीला पुढच्या शिक्षणासाठी मंगळुरुला पाठवले.
मारुती तारेने मात्र पिडीत मुलीचा पाठलाग करणं सोडलं नाही. त्याने मंगळुरुला जाऊन पिडीत मुलीला घरी आणले आणि तिच्याशी लग्नही केलं. पिडीत मुलीच्या कुटुंबियांना मुलीने प्रेमविवाह केला आहे असं वाटल्याने त्यांनी विरोध केला नाही. त्यानंतर मारुती तारे आणि पिडीत मुलगी एकत्रच राहत होते. पिडीत मुलगी लग्नानंतर नऊ वेळा गरोदर राहिली मात्र दरवेळी मारुतीने तिला गर्भपात करायला भाग पाडलं.
दहाव्या वेळी मात्र मारुतीने विरोध केला नाही आणि त्यांना मूल झालं. पण मूल झाल्याने मारुती बैचेन होता आणि त्याने मुलाला उदगीरमधील अनाथाश्रमात पाठवून दिलं. 2012 मध्ये पिडीत मुलगी पुन्हा गरोदर आणि यावेळी मारुतीने पुन्हा विरोध करत तिला गर्भपात करायला सांगितलं. पिडीत मुलीने नकार दिल्यानंतर मारुतीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. पिडीत मुलीने आपल्या आई-वडिलांचं घर गाठल आणि औरद पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.
न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी करत मारुतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या वतीने सरकारी वकिल रामचंद्र लमाने यांनी युक्तिवाद केला.