बंगळुरू : शहरातील बोम्मनहळ्ळी भागातील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील तब्बल १०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तिथे झालेल्या पार्टीनंतरच या सर्वांना संसर्ग झाला आहे. बंगळुरू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. एकूण १०३ रुग्णांपैकी ९६ जणांचे वय ६० पेक्षा अधिक आहे, असेही महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे लोक घाबरून गेले आहेत. त्या इमारतीतील एका व्यक्तीला सर्दी, ताप आदी त्रास सुरू झाला. तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या चौकशीनंतर इमारतीत राहणाऱ्या सर्व १०५२ जणांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यावेळी तब्बल १०३ जण पाॅझिटिव्ह आढळूनआहे. या प्रकारानंतर यांच्यापैकी किती जण इतरांच्या संपर्कात आले होते त्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यातील कोणाला संसर्ग झाला आहे का, याचा शोध महापालिकेचे अधिकारी घेत आहेत.
४० नर्सेसना कोरोनाशनिवारी बंगळुरूच्याच मंजुश्री कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या ४० विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. या संस्थेत शिकणाऱ्या २१० पैकी ७० टक्के विद्यार्थिनी केरळच्या रहिवासी आहेत. या प्रकारानंतर सर्व २१० विद्यार्थिनींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लागण झालेल्या बहुसंख्य मुलीही केरळच्या असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. या प्रकारानंतर केरळहून शिकायला येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्याचे ७२ तासांच्या काळातील प्रमाणपत्र आणणे कर्नाटकने बंधनकारक केले आहे. तसेच सर्व नर्सिंग व मेडिकल कॉलेजमधील प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात येईल.