ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 24 - एका हैदराबादी महिलेची सौदी अरेबियात एजंटांकडून फसवणूक करण्यात आली असून, तिला 3 लाख रुपयांना विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला सौदी अरेबियात मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातोय. 39 वर्षांच्या सलमा बेगमला दोन एजंट्सनी 21 जानेवारीला घरगुती कामाच्या व्हिसावर सौदी अरेबियाला पाठवलं. त्यानंतर सलमा हिने स्वतःच्या मुलीला मॅसेज करून सांगितलं की, मला तीन लाख रुपयांना विकण्यात आलं आहे आणि माझ्यावर अमानुष अत्याचार केले जात आहेत.दरम्यान, सलमाच्या मुलीनं तेलंगणा आणि केंद्र सरकारकडे आईला सुखरूप सोडवून भारतात आणण्यासाठी मदत मागितली आहे. हैदराबादमधील बाबानगरमध्ये राहणा-या सलमा बेगमच्या मुलीनं "त्या" दोन एजंटांवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, अक्रम आणि शफी नावाच्या दोन एजंटांनी माझ्या आईची फसवणूक करून तिला सौदी अरेबियात विकलं आहे. ते दोघेही याच भागात राहतात. माझी आई सौदी अरेबियात कठीण प्रसंगाला तोंड देत आहे. तिला घरी परतायचं आहे. मात्र तिला विकत घेतलेला शेख पुन्हा भारतात पाठवण्यास तयार नाही. मी अक्रमला सांगून माझ्या आईला परत भारतात आणण्याचा तगादा लावला आहे. मात्र त्याने माझ्या आईला भारतात परत आणलं नाही. त्यानंतर समीनानं कांचनबाग पोलिसांत याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. समीनाच्या मते, तिच्या आईला 3 लाख रुपयांमध्ये विकण्यात आलं आहे. माझ्या आईला त्या व्यक्ती(शेख)शी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र आईनं त्याला विरोध दर्शवला. त्यानंतर आईनं मला मेसेज करून मला विकत घेतलेला शेख भारतात परत पाठवत नसल्याचं सांगितलं. पोलिसांत तक्रार देऊनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप सलमाच्या मुलीनं केला आहे. पोलिसांनी अक्रमला स्टेशनला बोलावलं होतं. त्यावेळी 20 फेब्रुवारीला तुझ्या आईला परत भारतात आणू, असं अक्रम म्हणाला होता. मात्र अद्यापही तिला भारतात आणलं नाही. सलमाने स्वतःच्या मुलीला एक ऑडिओ मेसेज पाठवला आहे. ज्या मेसेजमध्ये सलमाने केंद्र सरकारकडे भारतात परतण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. गल्फ कोऑपरेशन काउंसिल (GCC)च्या सदस्य देश असलेल्या कुवेत, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया, यूएईमध्ये कफाला सिस्टीम लागू आहे. या माध्यमातून विदेशात काम करण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला स्पॉन्सरच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागतं. याचाच फायदा घेऊन त्यांचं शोषणही केलं जातं. तसेच GCC देशांमध्ये शेखच्या परवानगीशिवाय कोणीही देश सोडून जाऊ शकत नाही.