नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील चार लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चूल पेटवून झोपल्यानंतर गुदमरून या चौघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. उत्तर दिल्लीतील खेडा परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या हाडे गोठवणारी थंडी असल्याने प्रत्येकजण थंडीपासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे. खेडा परिसरातील एका कुटुंबाने घरात उब निर्माण व्हावी, यासाठी झोपण्याआधी चूल पेटवून ठेवली. मात्र या चुलीचा रात्री प्रचंड धूर झाला आणि सकाळी हे कुटुंब मृतावस्थेत आढळले.
मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. मुलांचे वय ७ वर्ष आणि ८ वर्ष इतके होते. थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, रात्रभर चूल पेटवून ठेवून गुदमरून मृत्यू झाल्याची दिल्लीतील ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीही एका तरुणाचा अशाच प्रकार मृत्यू झाला होता. रात्रभर चूल पेटवून ठेवल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरातून कार्बन मोनो-ऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर पडतो. त्यामुळे जीव जाण्याचा धोका निर्माण होत असल्याने याबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.