ऑनलाइन लोकमत -
चेन्नई, दि. 15 - शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या किझामूर गावात 50 भटक्या कुत्र्यांना जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्यांना मारण्याआधी त्यांच्या जेवणात किटकनाशक औषध मिसळण्यात आलं होतं. मेंढ्या, बक-यांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यांच्या रागातून काही गावक-यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका गावक-याने प्राणीमित्र पी अस्वथ यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर चार दिवसानंतर ही घटना उजेडात आली. अस्वथ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार गावक-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुरली, मुथू, मुरुगदोस आणि जीवा या गावक-यांचा समावेश आहे. आमच्या मेंढ्या, बक-या चरत असताना काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याचं गावक-यांनी सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
'मी जेव्हा पंचायतीचे प्रमुख आणि इतरांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र 50 हून जास्त कुत्र्यांची हत्या झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत', असं अस्वथ यांनी सांगितलं आहे.
'पोलिसांकडे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा त्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यांना कदाचित गावक-यांची बाजू पटली होती. पण कुत्र्यांना विष देऊन नंतर केरोसिन टाकून जाळण्यात आलं होतं. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा काही मृतदेह अर्धे जळालेल्या अवस्थेत होते, अखेर मी ते सर्व मृतदेह गोळा करुन जाळले', असल्याचंही अस्वथ यांनी सांगितलं आहे.