धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 08:38 AM2024-06-17T08:38:50+5:302024-06-17T11:02:47+5:30
नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते.
रायसेन :मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका मद्य कारखान्यात चिमुकल्यांकडून काम करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, तेथून ५८ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) बचपन बचाओ आंदोलनाच्या (बीबीए) सहकार्याने शनिवारी सोम डिस्टिलरीवर कारवाई केली.
एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोम डिस्टिलरीवर छापा टाकून १९ मुली, ३८ मुलांची सुटका केली. मुलांच्या हातावर हानिकारक रसायने आणि अल्कोहोलमुळे जळण्याच्या खुणा होत्या. मालक या मुलांना दररोज स्कूल बसमधून कारखान्यात पाठवत होता. गुदमरायला होईल, अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात त्यांच्याकडून १२ ते १४ तास काम करून घेतले जात होते.
ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. संबंधित विभागांकडून याची माहिती घेण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते.
उत्पादन शुल्क विभागाचे चारजण निलंबित
बालकामगारप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्तांनी रायसेनचे प्रभारी जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कन्हैयालाल अतुलकर, उपनिरीक्षक प्रीती उईके, शेफाली शर्मा व मुकेश श्रीवास्तव यांना निलंबित केले.
पोलिस, प्रशासन कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप
पोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल केला. मात्र, रात्री उशिरा आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी पोलिस व प्रशासन कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ज्या बालकांची सुटका करण्यात आली. त्यांना पोलिसांनी गायब केले असून, कंपनीवर जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. कारवाईत सुधारणा न झाल्यास आपण न्यायालयात जाऊ, अशा इशाराही त्यांनी दिला.